CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

नीट पेपरफुटी प्रकरणावर अखेर केंद्र सरकारला विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी बसावे लागले. दिल्लीतील कॉन्स्टीट्यूशन क्लबमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) सौरभ दास आणि आशुतोष रांका आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यात शुक्रवारी (दि. 24) तब्बल 50 मिनिटे बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने विद्यार्थ्यांच्या तीनपैकी दोन प्रमुख मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर निर्णय देण्यासाठी सरकारने शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंतचा अवधी मागितला आहे. सरकारने काही पावले मागे घेतली असली, तरी ‌‘राजीनामा मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाही,’ अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.

बैठकीनंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेची माहिती दिली. नीट पेपरफुटीमुळे मानसिक तणावातून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच जंतर-मंतर आंदोलन आणि ‌‘संसद चलो’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे आणि कायदेशीर कारवाई मागे घेण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. मात्र, आंदोलनाची मुख्य मागणी असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. या विषयावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शनिवारी दुपारी निर्णय कळविण्यात येईल, असे सरकारने बैठकीत सांगितल्याचे सीजेपीने स्पष्ट केले. यावर कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहील. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या पुढील बैठकीकडे लागले आहे.

जंतरमंतरवर ‌‘अंगठा लावा अभियान' सुरू
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा एक नवीन मार्ग स्वीकारला आहे. आंदोलनस्थळी अंगठा लावा अभियान (अंगठ्याचे ठसे उमटवण्याची मोहीम) सुरू करण्यात आले आहे. येथे झाडाच्या फांद्यांचे चित्र असलेला एक मोठा कॅनव्हास उभारण्यात आला आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांसह सहभागी लोक पानांच्या जागी आपल्या अंगठ्याचे ठसे उमटवत आहेत. देशभरातील तरुण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, हा संदेश शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अंगठ्याचे ठसे त्यांना पाठवले जाणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
चुकीबद्दल मुलांची माफी मागा : राहुल गांधी
20 जुलै रोजी, दिल्ली पोलिसांनी दिल्लीत एका शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या 16 वर्षीय साहिलच्या चेहऱ्यावर पेलेट गनने हल्ला केला. साहिल हा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. पण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो अर्धवेळ कार चालवण्याचे कामही करतो. तो स्वतः 2025 च्या एसएससी दिल्ली कॉन्स्टेबल पेपरफुटीचा बळी आहे. न्याय आणि चांगल्या भविष्याच्या मागणीसाठी आंदोलनात सामील झाला होता. आज, त्याच्या एका डोळ्याची दृष्टी कायमची जाण्याचा धोका आहे. प्रश्न विचारल्याबद्दल आणि जबाबदारीची मागणी केल्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना ही शिक्षा मिळाली आहे. आम्ही साहिलच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही जबाबदारीची मागणी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे आहोत. मोदीजी, या चुकीबद्दल देशातील मुलांची माफी मागा, जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करा आणि धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
पोलिसांच्या अत्याचाराविरोधात वेबसाईट
सीजेपी पोलिसांच्या अत्याचारांविरुद्ध एक वेबसाईट सुरू करत आहोत, अशी सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी घोषणा दिली. संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार आहोत. गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाईसाठी पाठपाठपुरावा करून त्यांना तुरुंगात पाठविणार आहोत, असा इशारा सौरव दास यांनी दिला.
Exit mobile version