निकाल जाहीर होण्यापूर्वीच सरकारी प्रमाणपत्र पोर्टल ठप्प

विद्यार्थ्यांचे हाल, शिथिलतेची मागणी

। उरण । प्रतिनिधी ।

बारावीचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दाखल्यासाठीचे शासकीय पोर्टल गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने उरणमधील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुढील शिक्षणासाठी जात, उत्पन्न, रहिवासी आदी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र, पोर्टल बंद असल्याने हे दाखले मिळविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीचा परिणाम सेतू केंद्रांवरही झाला असून, पोर्टल बंद असल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. नागरिकांची गर्दी वाढत असताना सेवा देणे शक्य नसल्याने सेतू चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरवर्षी निकालाच्या काळात पोर्टल बंद पडण्याचा अनुभव येत असल्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना आवश्यक शिथिलता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, संबंधित पोर्टलवरील तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी दूर करून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version