शासकीय कार्यालये ठेकेदारीच्या विळख्यात

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान हे ब्रिटिशकालीन मुंबई, पुण्यापासून अगदी जवळचे छोटेसे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी ब्रिटिश राजवटीपासून वीज, पाणी यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. या आजही सुरू आहेत. परंतु, या सुविधा आता ठेकेदार कर्मचार्‍यांवर विसंबून असल्याचे चिन्ह माथेरानमध्ये दिसत आहे. सरकारी नोकरीतून सेवामुक्त झाल्यानंतर येथे पुन्हा भरती होत नाही, तर त्या जागी ठेकेदारीतून कर्मचारी नियुक्त केला जात असल्याने माथेरानमधील शासकीय कार्यालय आता बहुतांश ठेकेदारीच्या कर्मचार्‍यांवरच अवलंबून असल्याचे चित्र सर्वच खात्यात दिसून येत आहे.

माथेरानमध्ये नगरपालिका कार्यालयामध्ये बहुतेक पदेही रिक्त असून, त्यांची कामे पाहण्याकरिता ठेकेदारी पद्धतीवर नियुक्त केलेल्या लोकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक जण येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागा भरल्या गेल्या नाही. त्यामुळे येथे अधिकारी उपलब्ध नसल्यास त्या जागी ठेकेदार कर्मचारी उपस्थित असल्याने अनेक वेळा नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागते. माथेरानमधील नगरपालिकेच्या माध्यमातून सफाई कामगार बांधकाम विभाग नगरपालिका कार्यालय त्याचप्रमाणे प्रवासी करसारख्या अनेक विभागांमध्ये 140 होऊन अधिक कर्मचारी ठेकेदारीद्वारे नियुक्त्या करून त्यांच्यामार्फत काम पाहिले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती केल्यामुळे येथील स्थानिक तरुणांना नगरपालिकेमध्ये नोकरीचा वावच राहिलेला नाही.

येथील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा आहे तो पाणीपुरवठा विभाग. या विभागामध्ये सध्या बावीस कर्मचारी हे ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केले गेले आहेत. वॉलमन, फिल्टर हाऊस व इतर ठिकाणी ते कार्यरत आहेत. येथे कायम सरकारी नियुक्त कर्मचारी हे बोटावर मोजणे इतकेच आहेत. त्यामुळे या ठिकाणीही ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केलेल्या तरुणांना अति अल्प वेतनावर नोकरी करावी लागत आहे. येथे कोणतेही नोकरीचे साधन नसल्याने या तरुणांना नाईलाजाने या पद्धतीने नोकरी करावी लागत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारी खात्यामध्ये कार्य करत असल्याने ठेकेदारी कर्मचारी शासकीय कामे करताना पहावयास मिळतात, ही फार मोठी चिंतेची बाब आहे, त्यामुळे यावर निर्णय होणे गरजेचे असून शासकीय कार्यालयांना ठेकेदारी मुक्त करणे हे आता शासनाच्या हातामध्येच आहे.

Exit mobile version