दिबांच्या नावासाठी सरकार सकारात्मक

विमानतळ सुरू होण्याआधी नामकरणाची प्रक्रिया मार्गी लागणार

| उरण | वार्ताहर |

दिबांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव जाहीर करेल, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी सोमवारी (दि. 7) नवी दिल्ली येथे जाहीर केली.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नामकरणासंदर्भात लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत नायडू बोलत होते. नामकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच या संदर्भातील सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी कृती समितीने मागणी केल्याप्रमाणे आजची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीशी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नायडू यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले की, दिबांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही नावाचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाला आलेला नाही. निवडणुका आणि राजकारण यांच्यापेक्षा दिबांचे नाव फार मोठे आहे. त्यांच्या नावासाठी कोणाचा अडथळाही नाही, सरकार दिबांच्या संघर्षाचा सन्मान करते. त्यांच्या नावासाठी आपण केलेल्या संघर्षाच्या आपल्या भावनाही आम्ही जाणतो. दिबांच्या आणि आपल्या संघर्षांचा सन्मान करीत आम्ही लवकरच दिबांचे नाव विमानतळाला जाहीर करू. राज्य सरकारने पाठवलेला नामकरणाचा प्रस्ताव प्रक्रियेचा भाग म्हणून मंजुरीस पाठवला आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पीएमओ आणि कॅबिनेटकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन देत मंत्रीमहोदयांनी विमानतळ सुरू होण्याआधी नामकरणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिबांचे नाव जाहीर करण्यास आम्हाला आनंद वाटेल, असे यावेळी अधोरेखित केले.

याप्रसंगी झालेल्या चर्चेत राज्य मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील, आ. राजू पाटील, भूषण पाटील, जे.डी. तांडेल, संतोष केणे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता. बैठकीसाठी अतुल दिबा पाटील, जे.एम. म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, दीपक पाटील, शरद म्हात्रे, सुशांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव विमलूमंग वुलनाम आणि निर्देशक नयोनिका दत्ता आदी उपस्थित होते.

Exit mobile version