। रसायनी । वार्ताहर ।
प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाने वेगळं काहीतरी दिलेल आहे. त्याच्या आतमध्ये असलेल्या सुप्तगुणांना ओळखण्यासाठी शिक्षकांनी मदत करावी, शासनाच्या जनहिताच्या योजनांचा प्रसार करून सर्वसामान्य माणसाला लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले आहे.
गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर यांनी खालापूर तालुक्यातील बिटस्तरीय शिक्षकांची आढावा बैठक,मिशन कवच कुंडल व ग्रामपंचायत मार्फत शाळेसाठी करण्यात येणार्या उपाययोजना यासाठी चौक,खालापूर व वावोशी येथे आयोजित केली होती.शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या सद्या गाजत असलेल्या जय शिवराय या पुस्तकातील जनहिताच्या बाबींचा ग्रामस्थांना फायदा व्हावा या उद्देशाने शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यासाठी देशमुख यांना बोलाविले होते.
चौक येथील सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर येथे शिक्षक सभेत प्रशांत देशमुख बोलत होते.जय शिवराय पुस्तकातील जीवा महाले यांच्यासह अनेक दाखले देत विद्यार्थ्यांना घडवत असताना जनहिताच्या योजना यांचा प्रसार कसा करावा हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन केला. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी आवाहन केले.यावेळी शाळांचे मुख्याध्यापक,केंद्र प्रमुख,पदवीधर शिक्षक यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बडेसर यांनी केले.