काळ नदीच्या प्रदूषणाची शासनदरबारी दखल

नदीवरील तवंग हटविण्याचे तातडीचे आदेश; संभाव्य जलसंकट बाबत सविस्तर चर्चा

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्याची जीवनदायिनी आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार असलेल्या काळ नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न अखेर शासनदरबारी पोहोचला आहे. नदीच्या पाण्यावर दिसणारे हिरवट, पिवळसर आणि लालसर तवंग, वाढते जलप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला संभाव्य धोका याची दखल घेत राज्याच्या पर्यावरण विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, नदीवरील तवंग आणि दूषित पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले आहेत.

काळ नदीच्या प्रदूषणाची सद्यस्थिती, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि भविष्यात उद्भवू शकणारे जलसंकट याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. माणगाव शहरासह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आधार असलेल्या काळ नदीचे पाणी सध्या प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काळ नदीच्या पाण्याची तातडीने वैज्ञानिक तपासणी करणे, प्रदूषणाचे नेमके स्रोत शोधून काढणे, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करणे आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर आवश्यक ती कारवाई करणे, अशी मागणी करण्यात आली होती.

काळ नदी ही केवळ एक जलवाहिनी नसून माणगाव शहर आणि परिसरातील गावांच्या जीवनाशी जोडलेली नैसर्गिक संपत्ती आहे. पिण्याचे पाणी, शेती, पर्यावरण आणि जैवविविधता या सर्वांचे अस्तित्व नदीच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक गरज आहे. आता शासनाच्या आदेशानंतर प्रत्यक्ष चौकशी कधी सुरू होते, पाण्याचे नमुने तपासले जातात का, प्रदूषणाचे मूळ स्रोत शोधून त्यांच्यावर कारवाई होते का आणि नदी पुन्हा स्वच्छ करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या जातात का, याकडे माणगावकरांचे लक्ष लागले आहे.

माणगावकरांची एकच अपेक्षा-काळ नदीचे पाणी पुन्हा स्वच्छ व्हावे, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी ही जीवनदायिनी नदी सुरक्षित राहावी!या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून भेट घेण्यात आली. यावेळी ॲड. राजीव साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, सुनील पवार उपस्थित होते.

संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे निर्देश
मंत्री मुंडे यांनी अलिबाग आणि पुणे येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नदीच्या पाण्यातील दूषित घटक आणि पृष्ठभागावर साचलेले तवंग हटविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले आहेत.
Exit mobile version