आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे साकडे

उपजिल्हाधिकारी यांना धनगर समाजाने दिले निवेदन

| अलिबाग | प्रतिनिधी |

एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 50 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र मुदत संपत आली तरीदेखील त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांना मंगळवारी (दि.21) रोजी निवेदन देण्यात आले.

यावेळी नरेश कोकरे यांच्यासह धनगर समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले आहे. मात्र गेल्या 70 वर्षात सर्वच सरकारांनी त्यापासून फारकत घेतली. आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी धनगर समाजाने आमरण उपोषण केले. त्याअनुषंगाने झालेल्या बैठकीत 50 दिवसांची मुदत सरकारने मागितली होती. मात्र आरक्षण अंमलबजावणीसाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी, या मागणीसह धनगर आरक्षणासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत ॲड. कुंभकोणी यांची नियुक्ती करावी, न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणीसाठी अर्ज दाखल करावे,मेंढपाळांवर होणारे हल्ले रोखावेत, त्यासाठी स्वतंत्र कायदा आणून संरक्षण द्यावेत अशा अनेक मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

Exit mobile version