ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन करणार आहेत. येत्या 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन केले जाणार आहे. त्याची तयारी सुरु झाली असून ठिकठिकाणी बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागू करावा आणि जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असलेल्या सर्व गट क, ड च्या पदांची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून दहा टक्के पदभरती करावी या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. मात्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. नुकतीच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची राज्यस्तरिय बैठक झाली. या बैठकीत आयटेकचे कॉ. दिलीप पवार, शाहीर निकम, महासंघाचे कार्याध्यक्ष मिलींद गनवीर, ए. बी. कुलर्णी, मंगेश म्हात्रे, राहूल जाधव, गोविंद म्हात्रे, अरुण देसाई, सुहासिनी मोकाशी, संतोष चव्हाण, हरिश्चंद्र सोनावणे, बबन पाटील, आदी पदाधिकारी व राज्य कार्यकारिणी उपस्थित होते.

आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास 20 नोव्हेंबर रोजी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या जळगाव येथील जनसंपर्क कार्यालयात जबाव दो आंदोलनाद्वारे बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, रायगड जिल्ह्यातून पाचशे कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनाचे मंगेश म्हात्रे यांनी दिली. त्याची तयारी जोमाने जिल्हयात सुुरू आहे. तालुका स्तरावर ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात असल्याचे उपाध्यक्ष गोविंद म्हात्रे यांनी सांगितले.

Exit mobile version