। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरूवारी (दि.27) महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ रायगड, अनंत पांडुरंग भोईर विद्यालय आणि रघुनाथ शेठ जितेकर कनिष्ठ महाविद्यालय दापोली-पारगाव यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गावामध्ये ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. ही ग्रंथदिंडी काढून वाचन संस्कृतीला एक प्रकारे चालना देण्याचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर मराठी भाषेचा गोडवा गाणारे विविध उपक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.
प्राचार्य पुष्पलता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील, संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या संस्थापिका वैशाली जगदाळे, संत सेवा मंडळाचे प्रथमेश पुंडे, सुधागड कळंबोलीचे उपप्राचार्य संजय पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन महाराष्ट्र राज्य मराठी विषयक शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्ष रेखा कटके यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.