। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टीचे एस.आर.ए. अंतर्गत पुनर्वसन करण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे डेप्युटी कलेक्टर अमित शेडगे, सहाय्यक निबंधक बांगर यांच्यासही मा.आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, मा. नगरसेवक गणेश कडू, सुनील बहिरा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेडगे यांनी सांगितले की, पनवेलला 2020 साली झोपडपट्टी एस.आर.ए. अंतर्गत पुनर्वसन लागू झाले आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत आपल्या झोपडपट्टींचे पुनर्वसन करण्यासाठी काहीच अडचण नाही. त्यासाठी झोपडपट्टी धारकांना एकत्र करून प्रथम गृहनिर्माण संस्थेची स्थापना करावी. तसेच, 51% पेक्षा जास्त लोकांनी या योजनेला संमती देणे गरजेचे आहे. ज्या जागेवर झोपडपट्टी वसलेली आहे त्या जागामालकाचे संमती पत्र आवश्यक असणार आहे. 2010 नंतरच्या झोपड्या अपात्र असेल, हस्तांतरित झोपड्यांना मूळ मालकाचा पुरावा देणे गरजेचे, गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर कोणतेही झोपडी हस्तांतरित करता येणार नाही म्हणजे विक्री करता येणार नाही, अशा काही सुचना शेडगे यांनी झोपडपट्टी धारकांना केल्या आहेत. तर, मा. नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी सर्व झोपडीधारकांना पुनर्वसनासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.