महाजने येथील जि.प. शाळेचा स्तुत्य उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाजने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने गुरुवारी (दि.28) स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे नाटक करून उपस्थितांची मने जिंकली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढीसाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शिक्षणाबरोबरच दप्तराविना शाळा असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरीक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अलिबाग तालुक्यातील महाजने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी कोळीगीत, बालगीते व इतर नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
या उपक्रमात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. या स्नेहसंमेलनातून शेतीबरोबरच शिक्षणाचे महत्व पटवून देण्याबरोबरच मोबाईलच्या अतिरिक्त वापराच्या दुष्परिणामाची जाणीव कलेच्या माध्यमातून करून देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ व महिलांनी प्रचंड मेहनत घेतली.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाजने येथी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. हा एक चांगला उपक्रम शाळेने राबविला आहे. जिल्हा परिषद शाळेबद्दल आवड निर्माण होण्यासाठी तसेच, जिल्हा परिषद शाळेबद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. शाळा, ग्रामस्थ व पालक यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी असे उपक्रम होणे आवश्यक आहे.
– कृष्णकुमार शेळके, केंद्र प्रमुख