शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रायगडात कृतज्ञता सप्ताह

| पनवेल | वार्ताहर |

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82 वा जन्मदिवस तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व शरद पवार यांना प्राप्त झाल्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या पाचही विभागांच्या वतीने पवार यांच्या जन्मदिनाच्या औचीत्याने कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर यांनी दिली.

ते कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेस संबोधित करत होते. यावेळी रायगड विभागीय चेअरमन आ.बाळाराम पाटील, मॅनेजिंग कौन्सिल मेंबर माजी खा.रामशेठ ठाकूर, जनरल बॉडी सदस्य जे.एम. म्हात्रे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

कृतज्ञता सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे पवार यांच्या विविध भाव मुद्रा दर्शविणारी भव्य महारांगोळी असणार आहे. तब्बल 40 हजार स्क्वेअर फूट आकारमान असणार्‍या या कलाकृतीकरता सहा हजार किलो वॉटरप्रूफ रांगोळी मागविण्यात आली आहे. कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मंगेश खुटारकर, रमेश खुटारकर आणि चेतन भोईर हे सुप्रसिद्ध रंगावली कलाकार ही कलाकृती साकारणार आहेत.

कृतज्ञता सप्ताहमध्ये
दि. 6 ते 8 डिसेंबर- नावडे येथील म्हात्रे विद्यालयात क्रीडा स्पर्धा.
दि. 7 डिसेंबर- गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये वक्तृत्व,स्पर्धा. पारगाव दापोली येथील भोईर विद्यालयात निबंध स्पर्धा.
दि. 8 डिसेंबर – लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज कामोठे येथे भव्य विज्ञान प्रदर्शन.
दि. 9 डिसेंबर – कामोठे न्यू इंग्लिश स्कूल येथे तज्ञ मंडळींचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धा.
दि. 9 डिसेंबर रोजी भव्य महारांगोळीचे लोकार्पण.
दि. 9,10 डिसेंबर – पनवेल फुले महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा,महाविद्यालयीन गटा करता निबंध स्पर्धा आणि आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धा.
दि. 11 डिसेंबर- वीर वाजेकर महाविद्यालय,फुंडे येथे अर्ध मॅरेथॉन.
दि. 12 डिसेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील विविध शाखांच्या मुख्यालयात वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
दि. 17 डिसेंबर रोजी वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात विभागीय स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न होणार आहे. यावेळी रघुनाथ माशेलकर,अनिल काकोडकर अशा दिग्गजांचे विचार ऐकण्याची पर्वणी उपस्थितांना मिळणार आहे.

Exit mobile version