। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील जांभिवली येथे असलेल्या वनवासी कल्याण आश्रम येथे नव्याने विद्यार्थी निवास इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन पद्मश्री चैत्रम पवार यांचे हस्ते करण्यात आले, या इमारतीचे उभारणीसाठी सक्षम सारथी ट्रस्टचे सीआरएस फंडातून मदत होणार आहे.
कर्जत तालुक्यातील जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रम केंद्रात छात्रावासाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. वनवासी कल्याण आश्रमाच्या छात्रावासाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते झाले. या इमारतीचे बांधकामासाठी सक्षम सारथी ट्रस्ट, मुंबई यांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे या भूमिपूजन सोहळ्यासाठी ट्रस्टचे संचालक नित्यम खोसला हे आवर्जून उपस्थित होते. सक्षम सारथी ट्रस्टचे सीएसआरच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले आहे. यावेळी कार्यक्रमात ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्त्या ठमाताई पवार तसेच जयंत अभ्यंकर, अविनाश म्हात्रे, महेश देशपांडे, उदय टिळक, ईश्वर चौधरी आणि अशोक भगत यांची विशेष उपस्थिती होती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, कल्याण आश्रमाचे अनेक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी तसेच जांभिवली, गौरकामत आणि वदप येथील रहिवाशी उपस्थित होते. वनवासी कल्याण आश्रम जांभिवली केंद्र हे गेली 40 वर्षे जनजाती समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध गुण, कला व कौशल्यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य करत आहे. नव्याने उभारल्या जाणार्या इमारतीत 50 मुलांसाठी निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.