नैसर्गिक धबधब्यांकडे नागरिकांचा वाढता ओढा

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने डोंगरदऱ्यांमधून असंख्य नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले आहेत. अनेक प्रसिद्ध धबधब्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने प्रवेशबंदी किंवा निर्बंध लागू केले असल्याने नागरिकांनी पर्यायी ठिकाणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पनवेलमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 लगतच्या डोंगररांगांमधून कोसळणारे लहान-मोठे धबधबे सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. रस्त्याच्या कडेला सहज उपलब्ध असलेल्या या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. लहान मुलांपासून तरुण-तरुणी तसेच कुटुंबीय धबधब्यांच्या सान्निध्यात पावसाळी वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहेत. अनेक जण फोटो, सेल्फी आणि व्हिडिओ शूट करून पावसाळी सहलीचा आनंद लुटत आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने डोंगर उतारांवर दगड कोसळण्याचा तसेच, पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळ्यामुळे साकारलेल्या या निसर्गरम्य धबधब्यांनी परिसराचे सौंदर्य खुलवले असून, पनवेलकरांसाठी ते आकर्षणाचे नवे केंद्र ठरत आहेत.

Exit mobile version