मे महिन्यात धडाडणार राजकीय दिग्गजांच्या तोफा

पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी दिग्गज नेते उतरण्याची शक्यता

| पनवेल | वार्ताहर |

मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात होणार असल्याने मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल आणि उरण मतदार संघात प्रचारासाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनीं अद्याप हजेरी लावलेली नाही. तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडल्या नंतर मात्र दिग्गज नेते मावळ मतदार संघात प्रचारासाठी उतरणार आहेत. मावळ लोकसभे साठी (दि.13) मे रोजी मतदान होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार कार्यात गुंतले आहेत.

देशात पाच टप्यात लोकसभेची निवडणूक पार पडणार असून, पहिल्या टप्यातील निवडणूक पार पडली आहे. तर शुक्रवारी (दि.26) दुसर्‍या तर पुढील महिन्यात (दि.7) मे रोजी तिसर्‍या टप्यातील निवडणूक पार पडणार असून, मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. परिणामी राज्यातील तसेच देशातील दिग्गज नेते दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात पार पडणार असलेल्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार आणि पदाधिकार्‍यांनी प्रचाराचा भार आपल्या खाद्यावर घेतला आहे. असे असले तरी पुढील महिन्यात देशात आणि राज्यात तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडल्या नंतर दिग्गज नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा मावळ लोकसभा मतदार संघात धडाडणार असल्याची माहिती युती आणि आघाडीच्या उमेदवारांच्या प्रतिनिधिनी दिली आहे. या करता वरिष्ठानकडून मिळणार असलेल्या नेत्याच्या नावा प्रमाणे सभेसाठी मैदान मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती प्रचार प्रमुखांनी दिली आहे. महायुती कडून उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभा पनवेल उरण विधानसभा मतदार संघात होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी कडून उबाठा गटाचे सेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच कॉग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत प्रचार सभा घेणार असल्याची माहिती दोन्ही गटा कडून देण्यात आली आहे.

प्रचार सभेसाठी मैदान मिळवण्यासाठी सभेच्या काही दिवस अगोदरच परवानगी काढावी लागते. त्या करता शासनाने सर्व प्रकारच्या परवानगी साठी सुरु केलेल्या विभागात योग्य कागदपत्रांसोबत परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. पनवेल विधानसभा क्षेत्रात मात्र सभे करिता मैदान उपलब्ध व्हावे या करता कोणत्याही उमेदवारा कडून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.
Exit mobile version