ठासणीच्या बंदुकीसह सराईत गुन्हेगार ताब्यात

| नेरळ | प्रतिनिधी |

ठासणीच्या बंदुकीचा गैरवापर करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एक ठासणीची बंदूक, शिश्याचे छरे आणि गंधक पावडर हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळवाडी खिंड परिसरात प्रशांत तुकाराम पारधी याच्याकडे ठासणीची बंदूक असल्याची माहिती नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत प्रशांत पारधी याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ठासणीची बंदूक तसेच शस्त्रासाठी लागणारे शिश्याचे छरे आणि गंधक पावडर बेकायदेशीररित्या आढळून आले. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुशिल काजरोळकर, तसेच पोलीस उपनिरीक्षक एस.एस. शेंबडे, आर.एन. वसावे, पोलीस हवालदार राजाराम पिंगळे, महेश खंडागळे, सचिन वाघमारे, निलेश कोंडार, राजेभाऊ केकाण, आशु बेदे, विनोद वांगणेकर आणि कुशल काळेखे यांनी सहभाग घेतला. नेरळ पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजीत पानसरे आणि उपअधीक्षक राहुल गायकवाड यांनी कौतुक केले आहे.

Exit mobile version