। उरण । प्रतिनिधी ।
गेली 40 वर्षाहून जास्त अधिक काळ लोटला तरी जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. वर्षानुवर्षे शासन दरबारी शांततेच्या व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी व जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी दि.14 एप्रिल रोजी उरण तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत. तसेच, 40 वर्षे उलटूनही मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील 88 शेतकरी व 168 बिगर शेतकरी अशा एकूण 256 कुटूंबांचे बोरीपाखाडी येथे 17 हेक्टर जमिनीत पुनर्वसन केलेले नाही. त्यामुळे न्याय हक्कासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना तर्फे करण्यात आले आहे.