। आगरदंडा । प्रतिनिधी ।
साळाव येथील जिंदाल विद्या मंदिरात यू.के.जी. वर्गाच्या पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यात चिमुकल्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शाळेचे प्राचार्य मुकेश ठाकूर हे होते. तर, सन्माननीय अतिथी म्हणून उपप्राचार्य मंगेश बमनोटे उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक समन्वयक अनिता बलयान, शिक्षकवृंद तसेच उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला. यावेळी मुकेश ठाकूर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी पालकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, शिक्षण हा केवळ ज्ञानप्राप्तीचा प्रवास नसून, तो मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पालक आणि शिक्षकांच्या सहकार्यानेच मुलांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना सिंग यांनी केले.