उत्पादन आले 25 टक्क्यांवर; उत्पादन आले 25 टक्क्यांवर
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
कोकणातील हापूस आंब्याला यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली असून केवळ सुमारे 25 टक्केच उत्पन्न उपलब्ध झाले आहे. परिणामी, यंदाचा हंगाम मर्यादित राहण्याचे स्पष्ट झाले असून दरवर्षीपेक्षा लवकर म्हणजेच 10 मेच्या आधीच आटपण्याची शक्यता व्यापारी आणि आंबा बागायतदारांकडून वर्तवली जात आहे.
हंगामाच्या सुरुवातीपासूनच बाजारातील आवक कमी राहिली असली, तरी सध्या त्यात हळूहळू वाढ दिसू लागली आहे. कोकणातून मर्यादित प्रमाणात हापूसच्या पेट्या बाजारात दाखल होत असून, दक्षिण भारतातूनही मोठ्या प्रमाणात पेट्यांची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी या काळात साधारण एक लाख पेट्यांची आवक होत असते; मात्र यंदा ती मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या एकूण आवक सुमारे 40 हजार पेट्यांपर्यंत पोहोचली असून पुढील काही दिवसांत ती 50 ते 55 हजार पेट्यांपर्यंत जाण्याची शक्यता मुंबई एपीएमसीतील आंबा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
हंगामाच्या विविध टप्प्यांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. 10 मेपर्यंत बाजारात आवक टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर देवगड व सिंधुदुर्ग भागातील आंब्यांची उपलब्धता कमी होईल, तर रत्नागिरी व इतर भागातील आंबे 25 मेपर्यंत बाजारात राहतील. पुढे गुजरात व जुन्नर भागातील आंब्यांची आवक सुरू होणार असली, तरी कोकणातील हापूसचा हंगाम त्यापूर्वीच ओसरेल असे मत आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, आखाती देशातील युद्ध थांबल्याचे म्हटले जात असले तर अंतर्गत कुरघोड्यांमुळे सागरी मार्गाने होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. अद्याप आखाती देशातील सागरी मार्गाने होणारी निर्यात सुरू न झाल्याने कोकणातील आणि भारतीय आंबा यंदा आखाती देशातील महत्वाच्या आणि मोठ्या बाजारपेठेला मुकला आहे.
त्याशिवाय इतर देशातील निर्यातीवरही वाढत्या वाहतूक खर्चाचा परिणाम झाला आहे. युरोप आणि अमेरिका या बाजारपेठांमध्ये निर्यात अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नसून, हवाई वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेसाठी सुमारे 600 रुपये प्रति किलो, तर युरोपातील देशांसाठी सुमारे 400 रुपये प्रति किलो इतका खर्च येत असल्याने निर्यातदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गुणवत्तेनुसार पेटीमागे 2 हजार ते 6 हजार रुपये दर मिळत असून उत्तम दर्जाच्या आंब्यांना 5,500 ते 6,000 रुपये दर मिळत आहे. इतर राज्यांचा आंबा 100 ते 200 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. याशिवाय बदामी, लालबाग यांसारख्या इतर जातींच्या आंब्यांची आवक वाढत असून त्यांचे दर अनुक्रमे 80 ते 110 रुपये आणि 70 ते 100 रुपये प्रति किलो दरम्यान आहेत.







