हरिश्चंद्र पाटील यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी हरिश्चंद्र वसंत पाटील यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‌‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2025′ जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे पेण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शेतकरीवर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

हरिश्चंद्र पाटील यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत खार जमिनीत यशस्वी शेतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी ‌‘एसआरटी’ या पद्धतीचा अवलंब करून भातलागवडीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. आव्हानात्मक आणि कमी उत्पादक मानल्या जाणाऱ्या खार जमिनीतही त्यांनी कष्ट, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वी प्रयोग साकारला आहे. त्यांच्या या अभिनव प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून, आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शनही मिळत आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना हा सन्मान प्रदान केला आहे.

या यशाबद्दल तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पेणचे अधिकारी व कर्मचारी यांनी हरिश्चंद्र पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, मंडळ कृषी अधिकारी अमित गावडे, उपकृषी अधिकारी रघुनाथ जाधव, कृषी सेवक प्रज्ञा खाडे तसेच पेण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. हरिश्चंद्र वसंत पाटील यांचा हा प्रयोग जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, अशा शुभेच्छा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version