भाजीपाल्याला येणार सुगीचे दिवस

शासनाच्या रोपवाटिकेत रोपे विकसित; लाभार्थ्यांना मिळणार अल्पदरात रोपे

| माणगाव | प्रतिनिधी |

कृषी विभागाच्या फळवाटिकांमध्ये आता अल्पदरात विविध भाजीपाल्यांची तयार केलेली रोपे शेतकरी लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. यावर्षी दरवर्षीपेक्षा माणगाव तालुक्यात भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेण्यात येणार असून, नजीकच्या काळात भाजीपाल्याला सुगीचे दिवस येणार आहेत.

माणगाव तालुक्यातील रोपोली तालुका शासकीय रोपवाटिकेत ही रोपे अत्याधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाने विकसित केली असून, या रोपाच्या लागवडीनंतर शेतकर्‍यांना विक्रमी उत्पादन मिळणार असल्याने लाभार्थी शेतकर्‍यातून प्रचंड उत्साह संचारला आहे. या रोपवाटिकेला शेतकरी व अल्प भूधारक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर काम करणार्‍या स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी भेट देऊन फळझाडे व भाजीपाला रोपांची पाहणी केली. त्यावेळी शेतकरी स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड यांना फळरोपवाटीकेचे कृषी पर्यवेक्षक पी.डी. देशमुख यांनी मार्गदर्शन करून शासनाच्या रोपवाटिकेतून लाभार्थी शेतकर्‍यांना ही रोपे अल्प दरात दिली जात असून, लाभार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

आदिम जमाती संवर्धन व विकास कार्यक्रम अंतर्गत एकात्मिक कीड रोग व कृषी उत्पादन वाढ या प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षण साहित्य या बाबीमधून माणगाव तालुक्यातील आदिवासी महिला शेतकरी गट यांना तालुका फळरोपवाटिका रेपोली येथून वांगी, टोमॅटो, मिरची या भाजीपाला पिकांची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी कृषी पर्यवेक्षक पी.डी. देशमुख, प्रमोद शिंदे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा व तालुक्यातील 10 आदिवासी महिला बचत गटांचे सभासद उपस्थित होते. यावेळी मिरची 25,000 रोपे, वांगी 20,000 रोपे, टोमॅटो 20,000 रोपे तयार केली असून, लाभार्थ्यांना लागवडीसाठीही उपलब्ध असल्याचे सांगितले. जेणे करून शेतकर्‍यांना बाजारात जाऊन बी-बियाणे न आणता ती आता लागवडीसाठी शेतकर्‍यांना पुरेसा वेळ मिळणार आहे.

माणगाव तालुक्यातील लागवड करू इच्छिणारे लाभार्थी शेतकरी ही तयार रोपे घेऊन आपल्या शेतात भाजीपाला पिकाची लागवड करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात निश्‍चित भर पडणार असून, शेतकर्‍यांना भाजीपाला लागवडीसाठी स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे हे मार्गदर्शन करीत आहेत.

Exit mobile version