| नेरळ | प्रतिनिधी |
आयुष्मान भारत डिजिटल मिशन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोकच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत शिबीर आणि आभा हेल्थ कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कर्जत तालुक्यातील आंबिवली अंतर्गत असलेल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंजप असून, या उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या रामावाडी येथे असंसर्गजन्य रोग हृदयरोग, कॅन्सरसंबंधी तपासणी तसेच कुष्ठरोग-क्षयरोगसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आभा (आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड नोंदणी आदी कार्यक्रम राबविले गेले. बोरिवली ग्रामपंचायतीमधील रामाची वाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ रूपेश सोनावळे, आरोग्य सेवक वारघुडा, आशा सेविका मीना लोभी यांनी रुग्णांची तपासणी केली. रायगड जिल्हा आरोग्यवर्धिनी सल्लागार डॉ सागर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आरोग्यवर्धिनी स्तरावर आयोजन केले होते. यावेळी जोखमीच्या रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले. तसेच रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या रूग्णांना शासनामार्फत औषधी पुरविण्यात आली.
यावेळी शिबिरात सहभागी रुग्णांची आभा हेल्थ कार्ड बनविण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक तरुण महेश बांगारे यांनी सहकार्य केले. दुसरीकडे सर्वांना आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सर्वांनी भविष्यात लाभ मिळवण्यासाठी आपले आभा कार्ड नोंदणी करून काढुन घेण्याचे आरोग्य विभागामार्फत डॉ. सोनावळे यांनी केले.