रायगड जि.प.चा अजब कारभार; आरोग्य विभागाचे प्रचार साहित्य रात्री रस्त्यावर!

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचे कारवाईचे आश्‍वासन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेचा अजब कारभार अलिबागच्या सजग नागरिकांमुळे चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागाचे प्रचार साहित्य रात्री रस्त्यावर ठेवली असल्याची बाब उघड झाली आहे. अलिबागमधील सजग नागरिकांनी दूरध्वनी करून याबाबत माहिती दिली. याबाबत रात्री 10.45 मिनिटांनी पहाणी केली असता ही बाब खरी निघाली. अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीच्या बाजूला रस्त्यावर प्रचार साहित्य गठ्ठे पडलेले त्यांना दिसून आले. स्थानिकांनी माहिती देताना ही पुस्तके सकाळपासूनच रस्त्यावर असल्याची माहितीही दिली. सावंत यांनी ही बाब समाजमाध्यमातून प्रसिद्ध करताच सकाळी ही पुस्तके रस्त्यावरून उचलून नेण्यात आली.

कोव्हीडच्या साथीमध्ये लहान मुलांची घ्यावयाची काळजी, सूचना इत्यादी बाबतची ही पुस्तके असल्याचे प्राथमिक दृष्टया दिसून आले आहे. कोव्हीडच्या साथी मध्ये शासनाने करोडो रुपये उपाय योजना व प्रतिबंधात्मक मार्गदर्शन यासाठी खर्च केले आहेत. अर्थात यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केलेला आहे. करोडो रुपयांची बिले काढून छापलेली ही पुस्तके अशी रात्री रस्त्यावर निष्काळजीपणे ठेवल्याने अधिकार्‍यांंना शासनाच्या पैशाची किंमतच नाही अशी टीका केली जात आहे. रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तालुक्यांना ही पुस्तके वितरित करण्यात आली होती. ज्या तालुक्यातील कर्मचारी यांनी ही पुस्तके रात्रभर रस्त्यावर ठेवली त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. – डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Exit mobile version