पुष्पकनगर नोडमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुष्पकनगर वसाहतीत जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य; तर सांडपाणी रस्त्यावर

पनवेल | साहिल रेळेकर |
पनवेल शहरालगतच नव्याने विकसित होत असलेल्या पुष्पकनगर वसाहतीमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून अद्यापही या कचऱ्याची सिडको प्रशासनाकडून व स्थानिक ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट लावली जात नसल्याने इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील आर ३, आर ४ व आर ५ सेक्टर परिसरातील मुख्य रस्त्यांवर, इमारतींच्या आवारात, मैदानात, मोकळ्या भूखंडावर तसेच जिथे पाहावे तिथे जागोजागी कचराच कचरा दिसून येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरत आहे व डासांची पैदासही वाढली आहे. याकडे सिडको प्रशासनाचे व स्थानिक ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून रोगराई पसरल्यास जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित चिंचपाडा, कोपर, वाघिवली वाडा, वाघीवली, ओवळे, कोल्ही, पारगाव, दापोली आदी गावांचे पुनर्वसन वडघर येथील सिडकोच्या पुष्पकनगर नोड येथे करण्यात आले आहे. याठिकाणी शेतकऱ्यांनी बिल्डरच्या साहाय्याने इमारती उभारल्या आहेत. पनवेल शहरातील फ्लॅट्सच्या दरांच्या तुलनेत पुष्पकनगर येथील फ्लॅट्सचे दर त्यातुलनेत कमी आहेत. त्यामुळे साहजिकच नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, पेण, अलिबाग, घाटमाथा आदी परिसरातून मोठ्या संख्येने याठिकाणी नागरिक सदनिका खरेदी करून रहावयास आले आहेत. परंतु इथल्या मूलभूत सोयी सुविधांकडे सिडकोचे व स्थानिक ग्रामपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष असल्याने येथील स्थानिक नागरिकांमधून व शेतकऱ्यांमधूनही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू करून घरांचे व पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असताना काही प्रकल्पग्रस्तांची घरे जबरदस्तीने जमीनदोस्त केली तसेच ज्यांनी स्वतःची घरे मोडून पुनर्वसन क्षेत्रात घरे बांधण्याकरीता सुरूवात केली असता सिडको पुनर्वसन क्षेत्रामध्ये सोयीसुविधा पुरविण्यास सिडको असमर्थता दर्शवित असून प्रकल्पग्रस्तांच्या घरे बांधकाम प्रक्रीयेत सिडको अडचणी निर्माण करीत आहे. पाठपुरावा करूनही अद्यापही इथल्या इमारतींना ‘ओसी’साठी सिडकोकडून रखडवले जात आहे. त्यामुळे ओसी नसल्यामुळे सिडकोकडून इथल्या रहिवाश्यांना पिण्यासाठी पाणीही पुरविले जात नाही. विशेष म्हणजे जोपर्यंत घरे खाली होत नव्हती तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास रस असलेले सिडको प्रशासन आता घरे खाली केल्यानंतर प्रश्न सोडविण्यास नकारात्मकता दर्शवित असल्याचे पुनर्वसन झालेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या परिसरात स्वयंभू श्रीगणेश मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर यासह अनेक लहानमोठी मंदिरे आहेत. त्यामुळे नियमितपणे याठिकाणी भजन, कीर्तन, हरिपाठ पारायण, उत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत असून मोठ्या संख्येने परिसरातील भाविक येत असतात. परंतु जागोजागी साचलेला कचरा, रस्त्यावर आलेले सांडपाणी, बंद अवस्थेतील विजेचे खांब, रस्त्याच्या कडेला टाकलेले डेब्रिज, कच्चे रस्ते, या साऱ्या अपुऱ्या सोयींमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या समस्येवर सिडको प्रशासनासह स्थानिक ग्रामपंचायतीने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व रहिवाश्यांमधून होत आहे.

सिडकोने विकसित केलेल्या पुष्पकनगर वसाहतीतील इमारतींना वडघर ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यावेळेस नागरिक ग्रामपंचायतीला घरपट्टी भरतील त्यावेळेस ग्रामपंचायत सोयीसुविधा पुरवेल. काही इमारती ५ वर्षांपूर्वीच्या आहेत, तरीही त्यांना घरपट्टीची आकारणी झालेली नाही. सिडकोने जरी वसाहत विकसीत केली असली तरीही सिडको ही स्थानिक स्वराज्य संस्था नसून टॅक्स घेण्याचा अधिकार सिडकोला नाही. टॅक्स आकारण्याचा अधिकार स्थानिक ग्रामपंचायतीलाच आहे. घरपट्टी आकारणी पूर्ण झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, गटार, स्ट्रीट लाईट, सांडपाणी व्यवस्थापन याबाबत योग्य कार्यवाही ग्रामपंचायतीकडून केली जाईल.
नंदकिशोर भगत (ग्रामविकास अधिकारी, वडघर ग्रामपंचायत)

या परिसरात जागोजागी साचलेला कचरा, रस्त्यावर आलेले सांडपाणी यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे व साचलेल्या सांडपाण्यामूळे मोठ्या प्रमाणात डासांचीही उत्पत्ती झालेली आहे. यामुळे रोगराई पसरण्यास वेळ लागणार नाही. एकीकडे कोरोनाचे संकट पसरले असून इथल्या कचऱ्यामूळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी ही विनंती.
मनखुश नाईक (स्थानिक नागरिक, से.आर ३)

Exit mobile version