। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 14 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. दोन महिने झाले तरी अध्यक्षांकडून निर्णयाबाबत हालचाल होत नसल्याचा दावा करत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या बाबतीत मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यावर आता 14 जुलै रोजी सुनावणीची शक्यता आहे.