माथेरानमध्ये चार दिवसांपासून संततधार पाऊस

| कर्जत | प्रतिनिधी |

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये चार दिवस संतधार पाऊस पडत आहे. गुरवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने अजूनही उसंत घेतली नसून, रविवार सकाळपर्यंत 507 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

माथेरानमध्ये अतिपावसामुळे जुम्मापट्टीदरम्यान घाटात रस्त्यावर माती वाहून आली तर जमिनीची धूप झाल्यामुळे एक झाड रस्त्यावर पङले. पण, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नसून, छोटे झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. त्यानंतर थोडा वेळ थांबलेली वाहतूक काही वेळातच पूर्वपदावर करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात उन्ह-पावसाचा खेळ सुरू असतो. तर इंद्रधनुष्याचही दर्शन या वेळेत नागरिकांना होते पण यंदा सप्टेंबर मध्ये पडत असलेल्या पावसाने जुलै महिन्याची आठवण करून दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून चांगले रस्ते कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांच्या देखरेखे खाली करण्यास आले. पण, यंदा माथेरानला ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने माथेरानमधील काळोखी परिसरात अति पाण्याच्या लोंढ्याने पेव्हर ब्लॉक निघाल्याने त्यांचा फटका एमएमआरडीएला बसला; परंतु रस्त्याचे झालेले नुकसान ठेकेदाराने लगेचच दुरुस्त करून पूर्ववत करून दिले आहेत.

या पावसात जरी कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी मुस्लिम मोहल्ल्यात काही घरात पाणी गेल्याने नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अतिपावसाने घाटातल्या रस्त्यावरदेखील छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. तर, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने माथेरान घाटातील धबधबे पुनर्जीवित झाले असून, सप्टेंबर महिन्यात पर्यटक जुलैचा आनंद घेताना दिसत आहेत. साधारण सप्टेंबर महिन्यात पावासाळी पर्यटन हंगाम संपत येतो; परंतु या पावसामुळे अजूनही पर्यटक माथेरानकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

Exit mobile version