1 ते 28 सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश
| रायगड | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतुकीवर अंकुश लावण्यात येणार आहे. जिल्हा कार्यक्षेत्रातील पोलादपूर, महाड, माणगावमार्गे पनवेलकडे येणारी मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील जड-अवजड वाहनांची वाहतूक ही वाकण फाटा, पाली-खोपोली फाटामार्गे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे व एन.एच. 04 (पनवेल-खोपोली जुना महामार्ग) या मार्गावरुन वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. हे आदेश दि. 28 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुरु असलेली पर्जन्यवृष्टी, मुंबई-गोवा महामार्गावरील दुरुस्तीचे कामकाज व पुढील महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव यामुळे सदर महामार्गाचे दुरुस्तीचे काम होणे आवश्यक आहे. सदर महामार्गावरील पोलादपूर महाड, माणगावमार्गे पनवेलकडे होणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन, सदर जड-अवजड वाहनांची वाहतूक वाकण फाटा, पाली-खोपोली फाटामार्गे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गे किंवा एन. एच. 04 (पनवेल-खोपोली जुना महामार्ग) मार्गे वळविणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक रायगड यांनी दिलेला आहे. याबाबत खात्री झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी हे आदेश जारी केले आहेत.