निवड समितीचा मुहूर्त ठरला; राहुल, सॅमसनबाबत होणार मोठा निर्णय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा यजमान भारत असून, 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेला काही आठवडे राहिले असतानाही अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, पुढील आठवड्या संघाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया कप खेळत असून, या संघातील बहुतांश खेळाडू हे विश्वकपच्या संघात असतील. मात्र, या संघनिवडीवेळी केएल राहुल आणि संजू सॅमसनच्या समावेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आयसीसीने वनडे वर्ल्डकप 2023 साठी सर्व सहभागी देशांना आपला संघ 5 सप्टेंबरपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने आशािय कपसाठी 17 खेळाडूंचा संघ निवडला आहे. मात्र, भारताला आता 15 खेळाडूंचा संघ निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे तिलक वर्मा आणि एक वेगवान गोलंदाज कमी होऊ शकतो.
निवड समितीला शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यातील एकाची निवड करावी लागणार आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये डेप्थ कमी आहे. अशावेळी शार्दुल ठाकूरची फलंदाजी उपयुक्त ठरू शकते. मधल्या षटकांमध्ये एक आक्रमक प्रवृत्तीचा खेळाडूची देखील गरज लागणार आहे. याचबरोबर जर केएल राहुल दुखापतीतून सावरू शकला नाही तर संजू सॅमसन हा त्याची भारतीय संघातील पर्याय असू शकतो. जर केएल राहुलने तंदुरुस्त चाचणी पास केली तर संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा हे संघासोबत राखीव खेळाडू म्हणून असणार आहेत.