रस्ते रुंदीकरण टपऱ्यांसाठीच का?
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात अनधिकृत टपऱ्यांचा सुळसुळाट वाढला असून, रस्ते रुंदीकरण करूनही त्याच रस्त्यांवर पुन्हा टपऱ्या थाटल्या जात असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या टपरीधारकांकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच दमदाटी व धमक्या दिल्या जात असल्याने पेणमध्ये ‘टपरीमाफियांचा’ हैदोस सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पेण नगरपालिका कार्यालय ते प्रेमनगर चौक या मार्गाचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूस असलेले गटारही सुसज्ज पद्धतीने बांधण्यात आले आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या जागेत अनधिकृतपणे टपऱ्या उभारण्यात आल्याने नागरिकांसाठी करण्यात आलेले रस्ते रुंदीकरण पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.
या टपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. काही टपरीधारक आपण नगरपालिकेला भाडे भरत असल्याचा दावा करीत असून, त्यासाठी 50 रुपयांची पावतीही दाखवत आहेत. काही जण तर थेट लोकप्रतिनिधींची नावे घेत, आम्हाला टपरी लावण्यास सांगण्यात आले आहे, असा ठाम दावा करीत आहेत. मात्र, 50 रुपयांचे भाडे भरून सार्वजनिक रस्त्यावर टपरी उभारण्यास परवानगी मिळत असेल, तर उद्या शहरातील सर्व रस्त्यांवर टपऱ्या उभ्या राहून वाहतुकीसह नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गावरच अडथळा निर्माण होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या अनधिकृत टपऱ्यांचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना काही टपरीधारकांनी दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, अशा शब्दांत धमकी देण्यापर्यंत काहींची मजल गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये प्रशासनाची कोणतीही भीती उरलेली नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय रामवाडी परिसरातील एका व्यक्तीने तब्बल तीन ते साडेतीन हजार रुपये भाडे घेऊन टपऱ्या बांधून दिल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामागे केवळ अतिक्रमण नसून टपऱ्यांच्या भाड्याचा स्वतंत्र व्यवसायच सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
एकीकडे नागरिकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून रस्ते रुंद केले जातात, गटारे बांधली जातात; तर दुसरीकडे त्याच जागेवर पुन्हा अनधिकृत टपऱ्या उभ्या राहत असतील, तर रस्ते रुंदीकरण नेमके टपरीधारकांसाठी की सर्वसामान्य नागरिकांसाठी? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. याबाबत पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी येत्या काही दिवसांत पोलीस बंदोबस्त घेऊन या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून त्या हटविण्यात येतील, असे आश्वासन दिले. आता मुख्याधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर पेण शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर प्रत्यक्षात कधी कारवाई होते आणि लोकप्रतिनिधींची नावे घेऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
