हल्ला, अत्याचाराविरोधात हिंदू एकवटले

अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरे आणि बौध्द विहारांवर हल्ले होत असून, नागरिकांवर अत्याचार केला जात आहे. त्याविरोधात सकल हिंदू समाज मंगळवारी (दि. 10) सकाळी अलिबागमध्ये एकवटला. बांगलादेशामध्ये होणार्‍या हल्ला व अत्याचाराचा तीव्र विरोध करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुक निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बांग्लादेशात हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा, इस्कॉनच्या साधूची तात्काळ मुक्तता व्हावी अशी मागणी यावेळी त्यांनी निवेदनद्वारे केली. बांग्लादेशातील हिंसाचाराचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. बांगलादेशातील अशांततेच्या पार्श्‍वभूमीवर इस्कॉन सेंटरला आग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्कॉन सेंटरमध्ये लक्ष्मी नारायण यांच्या मूर्तीचेही दहन करण्यात आले. मंदिरात ठेवलेले उर्वरित साहित्यही जळून खाक झाले. मंदिरावरही हल्ला झाला. या आगीत नमहट्टाचे इस्कॉन सेंटर जळून खाक झाले. हिंदूंवर सातत्याने हल्ले होत असून अनेक हिंदू मंदिरांना कट्टरवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी. तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध, आदिवासी व दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरतावाद्यांच्या अमानवीय अत्याचारांपासून मुक्ती द्यावी.बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे. या सर्व अत्याचारांची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. त्यामुळे सकल हिंदू समाज या कृत्याचा कठोर शब्दात निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version