तब्बल 9 तास वीजपुरवठा राहिला बंद
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील आकुर्ली-सुकापूर परिसरात महानगर गॅस कंपनीच्या खोदकामा दरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे 22 केव्ही नेरे मुख्य उच्चदाब वीजवाहिनीचे मोठे नुकसान झाले. परिणामी तब्बल नऊ तास वीजपुरवठा बंद राहिल्याने 100हून अधिक गाव-वाड्यांतील हजारो ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागला.
महानगर गॅसच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी वीजवाहिनी तुटल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. पर्यायी यंत्रणा उपलब्ध नसल्याने महावितरणला वीजपुरवठा तातडीने सुरू करता आला नाही. त्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात बसावे लागले. ऐन उन्हाळ्यात वीज गेल्याने आबालवृद्ध, लहान मुले आणि नागरिकांचे मोठे हाल झाले. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आले. अखेर पहाटे पावणे सहाच्या सुमारास वीजवाहिनी दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला. अचानक झालेल्या बिघाडामुळे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही रात्रभर जागरण करावे लागले. महानगर गॅस कंपनीच्या खोदकामातील निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.







