‘टीएमसी’मध्ये एचआयव्ही तपासणी शिबीर

| माणगाव | वार्ताहर |
जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माणगाव उपजिल्हा रुग्णालय एड्स नियंत्रण विभाग यांच्यामार्फत गुरुवार, दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत एच.आय.व्ही तपासणी शिबीर संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हर्षल जोशी यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथील समुपदेशक सौ. खेडेकर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. राजपूत यांनी सुरुवातीला एचआयव्हीची लागण कशामुळे होते आणि लागण होऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, याविषयी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्यक्षात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चंद्रकांत माळी यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारीवृंद मिळून एकूण 67 जणांनी या कार्यक्रमात आपली एचआयव्ही टेस्ट करून घेतली. शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत माळी यांनी उपस्थित समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रा. मोरे, अमित बाकाडे, सर्व प्राध्यापकवृंद यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Exit mobile version