| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये रविवार दि.13 ते 15 ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस ध्वजारोहणासह विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष नागेश पवार यांनी दिली.
पोलादपूर नगरपंचायतीतर्फे प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमांतर्गत भूमातेला नमस्कार आणि वीरांना वंदन असे विविध कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. 14 ऑगस्ट रोजी वीरपत्नी सुनिता तानाजी बांदल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असून, नगरपंचायतीमध्ये विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
मंगळवार, दि.15 ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज तिरंगारोहण सकाळी 8.30 वाजता नगराध्यक्षा सोनाली प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार असून, याप्रसंगी पोलादपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी तसेच आजी-माजी सैनिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा सोनाली प्रकाश गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी केले आहे.