गटशिक्षणाधिकारी पिंगळा यांचा सन्मान

| अलिबाग । प्रतिनिधी ।

ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी पुढाकार घेऊन भुमिका बजावल्याबद्दल अलिबागचे गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांचा सन्मान करण्यात आला. माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रा. के.वाय. इंगळे यांच्या हस्ते हा सन्मान नुकताच करण्यात आला.

कृष्णा पिंगळा गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी 12 वर्षे सुधागड तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. तसेच 2013 ते 2016 या कालावधीत तीन वर्षे अलिबागचे गटशिक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या जून 2023 पासून त्यांच्याकडे गट शिक्षण अधिकारी म्हणून धुरा देण्यात आली आहे. माणगाव परिसरातील नवोदय विद्यालयामार्फत 12 वीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या निवासी नवोदय विद्यालयात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्याबाबत प्राचार्यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला दुजोरा देत गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यानुसार 2022-23च्या तुलनेेने 2023-24 मध्ये परीक्षार्थी नोंदणीत सरासरी टक्केवारीमध्ये वाढ करण्यात अलिबाग केंद्राची महत्त्वाची भूमिका ठरली. त्यामुळे नवोदय विद्यालयाच्यावतीने गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version