अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पालव ते अलिबाग असा कारने प्रवास करीत असताना एका अज्ञाताने अलिबागमधील चारचाकी वाहनावर हल्ला करीत गाडीचे नुकसान केले. मागून येऊन दुसर्याने कार चालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून लंपास केली. ही घटना कुरुळ येथे रस्त्यावर सायंकाळी घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात दोन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश पाटील असे या तक्रारदाराचे नाव आहे. ते अलिबाग तालुक्यातील तळवली येथील रहिवासी आहेत. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पालव येथे हळदी समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम पुर्ण झाल्यावर त्यांच्या कारमधून सायंकाळी ते घरी निघाले. सुमारे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास कुरुळ येथे सतीदेवी मंदिरासमोर आल्यावर एका अज्ञाताने ट्रक आडवा घालून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा ट्रकद्वारे कारचा पाठलाग केला. कुरुळ-अलिबाग रस्त्यावरील चिद्बादेवी मंदिराच्या पुढे आल्यावर एका अज्ञाताने दुचाकीवर येऊन महेश यांची गाडी थांबवली. त्याने महेश यांच्या गाडीचे नुकसान केले. त्यानंतर महेश यांचा पाठलाग करणार्या ट्रक चालकाने मागून येऊन गळ्यातील सोन्याची चैन लंपास केली. याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची नोंदही करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार प्रतिक पाटील करीत आहेत. भर दिवसात वर्दळीच्या ठिकाणी अज्ञातांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याबरोबरच चोरीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला करणार्यांविरोधात पोलीस काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.