गेल कंपनीच्या स्फोटाच्या दणक्याने घरांना तडे

मल्याणमधील घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

स्फोटाच्या दणक्याने तालुक्यातील मल्याण येथील घरांच्या भिंतींना तडे जाऊन ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उसर येथील गेल कंपनीमार्फत सुरु असलेल्या खोदाईच्या कामांमुळे सदर नुकसान झाले असल्याने कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अलिबाग तालुक्यातील मल्याण येथील ग्रामस्थ रविवारी दुपारच्या दरम्यान घरात असताना, अचानक एक स्फोट झाला. घरांना हादरे बसून भिंतीना तडे पडले. त्यामुळे नागरिक भितीने घराबाहेर धावत आले. उसर येथील गेल कंपनीमार्फत सुरु असलेल्या खोदाईच्या कामांमुळे नुकसान झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केली असून, कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीच्या नव्या प्रकल्पाच्या कामांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे काम सुरु झाले आहे. ठिकठिकाणी खोदाई सुरु आहे. गेल कंपनीमार्फत सुरुंग लावून स्फोट करण्याचे काम शुक्रवारी सुरु असताना अचानक भला मोठा आवाज झाला. काही अंतरावर असलेल्या मल्याण येथील सुमारे पाच घरांतील भिंतीना तडे पडले. हादरा बसल्याने घरातील मंडळीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विनायक पांडूरंग पाटील, विजय शरद पाटील, संजीव शरद पाटील, सुशील शरद पाटील, विनायक शंकर पाटील या ग्रामस्थांच्या काही स्वयंपाक घरातील भिंतींना तडे पडले आहेत. तर काहींच्या मोठ्या खोलीतील भिंतींना तडे पडले आहेत. या आवाजामुळे पत्रेही हालली असल्याचा आरोप या ग्रामस्थांसह महिलांनी केला आहे. गावापासून सुमारे एक किलो मीटर अंतरावर गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरु आहे. परंतू मल्याण येथील गावांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीलादेखील विश्‍वासात कंपनीने घेतले नसल्याचा आरोप केला जात आहे. गेल कंपनीच्या जागेत सुयेदिया इंफ्रा प्रोजेक्कट प्रा. लि. या कंपनीमार्फत विस्फोटक वापरून अवैधरित्या स्फोट केला जात आहे. या स्फोटामुळे घरांना हादरे बसत आहेत. त्यामुळे भविष्यात होणार्‍या वित्त व जिवीतहानीला कंपनी प्रशासन जबाबादार असल्याचे सांगण्यात आले आहे. परवानगी घेऊन हे काम सुरु आहे का याची चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असून, याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्याला देखील कळविण्यात आले आहे.

Exit mobile version