राज्यसभेत प्रचंड गदारोळ

घोषणाबाजीतच पंतप्रधानांचे भाषण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

संसदेच्या दोन्ही सभागृहांत वाढलेल्या तणावाचे तीव्र पडसाद गुरुवारी राज्यसभेत उमटले. विरोधकांनी ‌‘लोकशाही वाचवा’ आणि ‌‘तानाशाही नाही चलेगी’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले, तर त्या गदारोळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण सुरू ठेवले.

लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर बोलण्याची संधी न मिळाल्याने विरोधक आधीच आक्रमक होते. त्याचेच प्रतिबिंब राज्यसभेत दिसून आले. पंतप्रधान भाषणासाठी उभे राहताच विरोधी पक्षांचे खासदार वेलमध्ये उतरले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
सभागृहात मोठा गोंधळ सुरू असतानाही पंतप्रधानांनी भाषण थांबवले नाही. त्यांनी सरकारच्या योजनांबाबत मांडणी सुरू ठेवली. दरम्यान, विरोधकांकडून महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घेण्याची मागणी होत असताना कामकाज सुरूच ठेवण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले. सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी नेत्यांनी सरकारवर टीका केली. देश सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवर उत्तरं देण्याऐवजी सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी लोकशाही मूल्यांबाबत प्रश्न उपस्थित केले.

Exit mobile version