काँग्रेसची मीच स्थायी अध्यक्षा- सोनिया गांधी

पुढील वर्षी सप्टेंबरात अध्यक्षपदाची निवड

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेसची मीच स्थायी अध्यक्षा असून,माझ्याबाबत सोशल मिडियातून न बोलता थेट बोला, असे निर्देश काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील विरोधकांना दिलेले आहेत.
दिल्लीत काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदांवर जोरदार खलबतं सुरू आहेत. अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा आरोप केला. हा मुद्दा काँग्रेसच्या कार्यकारणीच्या बैठकीतही उपस्थित झाला. यानंतर पक्षाने आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुका घेण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिक चर्चा करूया. आम्ही 30 जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता, पण कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मुदत अनिश्‍चित काळासाठी वाढवण्यात आली. आज स्पष्टता आणण्याची संधी आहे, असे स्पष्ट शब्दात सुनावले.
2019 मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी यांनीच आतापर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. देशातील काही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदी राहणार आहेत. या निवडणुकांनंतरच काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल.
सध्या पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीकडे लक्ष द्यावं, असंच त्यांचं म्हणणं होतं. आत्ताच पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेतल्यास निवडणुकांच्या तयारीवर याचा परिणाम होईल, असंही मत व्यक्त करण्यात आलं. कार्यकारणीतील बहुतांश सदस्यांनी नव्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होण्याआधी सदस्यता अभियान आणि स्थानिक पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंतच्या निवडणुका घेण्याचं मत व्यक्त केलं. मात्र, या निवडणुका डिसेंबर 2022 पर्यंत न घेण्याचंही मत व्यक्त करण्यात आलं.

आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण जर आपण एकजूट आणि शिस्तबद्ध राहिलो आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आम्ही चांगले काम करू.
सोनिया गांधी,काँग्रेस अध्यक्षा

Exit mobile version