कर्णधारपदाच्या वादावर गांगुलीने सोडलं मौन
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मी विराटला कर्णधारपदावरुन हटवलं नाही, असं सांगत बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुलीने कर्णधारपदाच्या वादावर मौन सोडलं आहे. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराट कोहलीने हा निर्णय घेतला होता. टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व करण्यात रस नसल्याची भावना त्याने व्यक्त केली होती. त्याने स्वेच्छेने टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याचे गांगुलीने सांगितले.
‘दादागिरी अनलिमिटेड सीझन 10’ या रिॲलिटी शोमध्ये बोलताना सौरव गांगुलीने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याने विराट कोहलीचे कर्णधारपद काढून घेतले नसल्याचे स्पष्ट केले. गांगुली म्हणाला, मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही. हे मी खूप वेळा सांगितले आहे. त्याला ट्वेंटी-20चे नेतृत्व करण्यास रस नव्हता. त्यामुळे, त्याने हा निर्णय घेतल्यानंतर, मी त्याला म्हणालो, जर तुम्हाला ट्वेंटी-20 मध्ये नेतृत्व करण्यास स्वारस्य नसेल, तर तुम्ही एकदिवसीय क्रिकेटमधूनही पायउतार झालात तर बरे होईल, असे मी त्याला सुचवले. कारण, मर्यादित षटकांच्या संघांसाठी एक कर्णधार व कसोटीसाठी दुसरा असे माझे मत होते.”विराट कोहलीच्या एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपदावर टीका होत असली तरी, कसोटी फॉरमॅटमधील त्याच्या कर्णधाराची नेहमीच प्रशंसा केली जाते आणि आकडेवारीच्या बाबतीत तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
गांगुलीने असेही खुलासा केला की रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्याची इच्छा नव्हती परंतु आम्ही त्याला कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार केलं. मी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी थोडासा आग्रह केला कारण त्याला खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्यात रस नव्हता. त्यामुळे कदाचित त्यात माझे थोडे योगदान असेल पण संघाचा चालक कोण आहे, यापेक्षा जास्त श्रेय हे खेळाडूंचेच आहे. जे मैदानावर चांगली कामगिरी करतात. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी काम करण्यासाठी माझी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, त्याचा हा एक छोटासा भाग होता, असे गांगुली म्हणाला.
