। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, तिच्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा, यासाठी तिच्या पंखात बळ भरण्याचे काम पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून होणार असून या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ उद्घाटन मंगळवार दि. 3 मे रोजी सकाळी 10.30 वाजता पी एन पी शैक्षणिक संकुल वेशवी येथे करण्यात येणार आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, आरसीएफ थळचे मुख्य महाव्यवस्थापक अनिरुद्ध खाडीलकर, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, वरिष्ठ व्यवस्थापक (सीएसआर) प्रमोद देशमुख, चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील यांच्यासह पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुलात हे शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून यात एक महिन्याचे प्रक्षिक्षण पूर्ण करणार्या 50 महिलांनाच शिवणयंत्र मोफत दिले जाणार आहे. मात्र, याकरिता काही नियम व अटी लागू असणार आहेत, असे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण तसेच महिलांची प्रगती होण्याकरिता कौशल्य विकास अंतर्गत टेलरिंग युनिट सुरू करून एका महिन्यात उद्योजिका बनवण्याचा मानस आहे. सर्व महिलांना विनंती आहे, की ज्यांना उपजीविकेचे साधन नाही, ज्यांना टेलरिंग क्षेत्रात आवड आहे, ज्यांना स्वकष्टाने काहीतरी करुन दाखवायची इच्छा आहे, अशा होतकरु महिलांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत, असे यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.