शुन्यातून विश्व निर्माण करा- आ.जयंत पाटील

I माणगाव I प्रतिनिधी I
प्रत्येकांनी आयुष्यात धैर्याने, निष्ठेने काम केल्यास शून्यातूनही विश्व निर्माण करता येते हे कृतीतून दाखवून द्या,असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केेले. माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रबोधन कौशल्य निकेतनचा दीक्षांत समारंभ सोहळा शनिवार दि. 22 जुलै रोजी गांधी मेमोरिअल हॉल येथे माजी मंत्री सुभाष देसाई, शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी प्रबोधन अध्यक्ष नितीन शिंदे, जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी चेअरमन नाना सावंत, भरत शाह, शिसवेन जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, आरडीसी संचालक अस्लम राऊत, प्रबोधन पहल पदाधिकारी, विध्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माणगांव तालुक्यात माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन व पहल संस्था उत्तम कार्य करीत आहे. आदिवासी व शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. त्यांना लागणारे सर्वोत्तपरी सहकार्य माझ्या व शेतकरी कामगार पक्षाकडून दिले जाईल. मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी आरडीसी बँकांकडून शैक्षणिक कर्ज देण्यात येईल,असे त्यांनी जाहीर केले.

यावेळी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, माणगांव तालुक्यात एक चांगला उपक्रम सुरू झालेला आहे. माणगांवचे आ. भाई सावंत हे प्रबोधनचे पहिले अध्यक्ष होते. अत्यंत कमी कालावधीत मुंबई बाहेर हा उपक्रम चालू झाला असून पहिला टप्पा पार पडला आहे. पहल संस्थेचे खालापूरमधील काम उल्लेखनीय आहे. तसेच माणगांव तालुक्यातील खेडोपाड्यातील तरुणांना सक्षम करण्याचे काम पहल व प्रबोधन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माणगांव तालुक्यात स्वतंत्र कौशल्य विकास संस्थांची इमारत लवकरच उभी राहणार असून 500 विध्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल याचा पुढील कालावधीत प्रयत्न करू. तालुक्यातील बचत गटांना आथिर्क पाठबळ देऊन त्यांचे कौशल्य विकसित करून बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देणार आहोत.असे ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. विध्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना प्रबोधन व पहलमुळे जीवनात किती बदल झाला. त्यामुळे आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो व आपले अनुभव सांगितले. विध्यार्थ्यां मार्फत विविध उपक्रम सादर करून त्यांची माहीती दिली. आ. जयंत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

Exit mobile version