महामार्ग विभाग सुस्त; तेलंगे मोहल्ल्यात मृत्यूचा सापळा
| महाड | प्रतिनिधी |
रस्त्यालगत उघडी विहीर, परिसरात अंधार आणि बाजूने सुसाट धावणारी वाहने… मृत्यूला निमंत्रण देणारे हे चित्र महाड-मंडणगड मार्गावरील तेलंगे मोहल्ल्यात दिसत आहे. विहिरीवर संरक्षक जाळी बसविण्याची वाहतूक शाखेने चार ते पाच वेळा लेखी मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आलेली नाही. एखादे वाहन विहिरीत कोसळून निष्पापांचे बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील इंदोरे-दिंडोरी परिसरात दरगुडे कुटुंबाची एसयूव्ही कार रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत कोसळून तीन प्रौढ आणि सहा लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महामार्गांलगतच्या उघड्या विहिरींचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, महाड-मंडणगड खाडीपट्टा मार्गावरील तेलंगे मोहल्ल्यातील विहीर अद्याप उघडीच आहे. रस्त्यापासून अवघ्या अर्ध्या फुटावर असलेली ही विहीर वाहनचालकांसाठी मोठा धोका बनली आहे. त्यातच रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या विहिरीवर संरक्षक जाळी बसविण्यासाठी महामार्ग वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी महाड येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला चार ते पाच वेळा लेखी पत्रे दिली आहेत. मात्र, वारंवार सूचना देऊनही संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. शाखा अभियंता अभिजीत झेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. या मार्गावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी महामार्ग विभागाने तातडीने विहिरीवर संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. चार-पाच पत्रांनंतरही प्रशासनाची झोप उडत नसेल, तर आता एखाद्या बळीचीच प्रतीक्षा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
