। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील बोर्ली साई मंदिर येथे कोलमांडला येथील सुरू असलेल्या बोर्ली खाडीपात्रातील अवैध भराव चालू असल्याचे बोलले जात आहे. त्याबरोबर कांदळवन तोडीमुळे पावसाळ्यात येणारी संकटे भरतीचे पाणी गावात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत ताराबंदर कोळीसमाज,बोर्लीतील कोळी समाज,पंचकूमसमाज, मुस्लिम समाज, बौद्धसमाज यांची संयुक्तसभा मान्यवरांच्या उपस्थितीत साई मंदिरात घेण्यात आली.
या सभेत कोलमांडला येथील गट क्र 54 मध्ये होत असलेल्या अवैध कामा विरोधात चर्चा करण्यात येऊन निषेधाचा ठराव घेण्यात आला. बोर्ली खाडीपात्रातील कांदळवन (मँग्रोज) तोड आणि भराव यामुळे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन वेळप्रसंगी काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास, त्यास गट क्र 54 मध्ये भरावाचे काम करणारे गट क्र 49 चे मालक हेच सर्वस्वी जबाबदार असतील असा ठराव घेण्यात आला. तसेच यापुढील पत्रव्यवहार हा सर्व समाज अध्यक्ष यांनी या प्रकणाशी निगडित सर्व सरकारी कार्यालयांशी करावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सभेस बोर्ली, ताराबंदर येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कोकण किनारपट्टीवरील अलिबाग व मुरूड तालुक्यात समुद्राला येवून मिळणार्या खाडया बुजविण्याचे काम राजरोसपणे सुरू असूनही प्रशासनाकडून होणार्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजीची भावना निर्माण झाली आहे. मागील पावसाळ्यात पाचशे मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला होता. पिठोरी अमावस्येला मोठ्या प्रमाणात पडलेला पावसामुळे गावात पाणी शिरुन नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मुरुड तालुक्यातील बोर्ली खाडीपात्रातील अवैध भराव, मँग्रोज तोडीमुळे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने घेण्यात आलेल्या सर्व समाज बांधवांच्या सभेत पावसाळ्यात वेळप्रसंगी आपत्ती निर्माण झाल्यास संबंधित मालक व प्रशासन जबाबदार राहतील असा निर्णय घेण्यात आला.