सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी

कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर ताब्यात

। मालवण । प्रतिनिधी ।

सागरी किनारपट्टीवरील मालवण, तारकर्लीसमोर महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणार्‍या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने शनिवारी पहाटे कारवाई करत ताब्यात घेतला आहे. पापलेट, सौदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे ट्रॉलरमध्ये मोठया प्रमाणात असून त्याचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हायस्पीड ट्रॉलर सर्जेकोट जेट्टी येथे आणण्यात आला आहे.

मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, शनिवारी (दि.19) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग-मालवण सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सागरी गस्ती दरम्यान परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकरसोबत सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक/ रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी, पोलिस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे यांनी कर्नाटक-मलपी येथील नौका वायुपुत्र 2 महाराष्ट्र राज्याच्या जलाधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडली. नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मच्छिमार संतप्त
मालवण सागरी किनारपट्टी भागात कर्नाटक मलपी तसेच अन्य राज्यातील हायस्पीड ट्रॉलर गेले काही दिवस सातत्याने मोठ्या संख्येने घुसखोरी करून रात्रीच्यावेळी मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान करतात. एका टॉलरवर कारवाई नको तरी अधिक कारवाई झाली पाहिजे. तसेच पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.
Exit mobile version