| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच तळोजा आणि खारघर परिसरात छापे टाकून परदेशी नागरिकांना सी-फॉर्म न भरता बेकायदेशीरपणे घरे भाड्याने देणाऱ्या 4 घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच बेकायदेशीर असलेल्या आफ्रिकन (नायजेरियन) नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान नुकतेच अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नागरिक राहत असलेल्या कोपरखैरणे, वाशी, खारघर आणि तळोजा परिसरात छापे टाकण्यात आले. या कारवाईत खारघर तळोजा परिसरातील 4 घरमालकांनी परदेशी नागरिकांना सी-फॉर्म न भरता बेकायदेशीररित्या आपल्या घरामध्ये भाडोत्री म्हणून ठेवल्याचे आढळून आले.
तळोजा येथील पार्वती हाईटस्, रूम नं. 501 येथे परदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे राहण्यास मदत केल्याप्रकरणी घरमालक शारंगधर नामदेव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खारघर येथील ड्रिम सफायर इमारतीमधील फ्लॅट क्रमांक 401आणि 402 तसेच सेक्टर-30, ओवे गाव येथील गॉडगिफ्ट को-ऑप. हौसिंग सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 304 येथे परदेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या घरे भाड्याने दिल्याप्रकरणी घरमालक यासीर जेठवा, शमा खान आणि श्वेता मुकेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व घरमालकांविरोधात तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या कारवाईत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी नागरिकांना भाड्याने घर देताना सी-फॉर्म भरणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भविष्यातही अशीच विशेष मोहीम सातत्याने सुरु राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
परदेशी नागरिकांचे बेकायदेशीररित्या वास्तव्य; चार जणांवर गुन्हा दाखल
