मुरुड येथून म्हशींची बेकायदा वाहतूक

तिघांना रंगेहाथ पकडले

| मुरूड | वार्ताहर |

मुरूड तालुक्यातील खोकरी-राजपुरी येथून आठ म्हशींची दाटीवाटीने कोंबून टेम्पोमधून बेकायदा वाहतूक करणार्‍या मुंबईतील तीन इसमांना बुधवारी रात्री (दि. 21) आठ वाजता मुरूड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

राजपुरी-खोकरी येथून टेम्पो क्र.एमएच 04_ केयू 5740 मधून मुंबईकडे आठ म्हशींची बेकायदा वाहतूक करण्यात येत असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी टेम्पोला थांबवून तपासणी केली असता दाटीवाटीने कोंबलेल्या आठ म्हशी टेम्पोत आढळून आल्या. या म्हशी गोवंडी (मुंबई) येथे नेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे याबाबत कोणतेही पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे तपासणी सर्टिफिकेट आणि परिवहन आधिकारी यांचा वाहतूक परवाना नव्हता. याप्रकरणी मोहम्मद वकील मोहम्मद यासिन कुरेशी (68), फराज वकील कुरेशी (31), शहनवाझ आलम खान (24), रा. देवनार गोवंडी (मुंबई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुरूड पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश पाटील अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version