मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

वनविभागाकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुडच्या वनविभागाकडून खैर तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाने तेलवडे आदिवासी भागात खैर लाकडाच्या 25 सोलीव नगांसह 2 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील तेलवडे गावाजवळील वनक्षेत्रात बेकायदेशीर सोलीव खैर लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मुरूड वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुरुड वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ व वनरक्षक हे बुधवारी (दि.11) रात्रीच्या सुमारास तेलवडे आदिवासी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना राखाडी रंगाची इको कार अवैधरित्या खैराच्या सोलीव 25 नगांसह वाहतूक करीत असताना आढळून आली. या प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, रमेश नारायण वाघमारे व राहुल रमेश वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, या कारवाईत खैराचे 25 सोलीव नग, इको कार, मोबाईल व मुद्देमालासह एकूण 2 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहा उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ, वनपाल राहुल कुलकर्णी, वनरक्षक विशाल ढोबळे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version