मुरुड वनविभागाची कारवाई
| चणेरा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील मुरुड-रोहा रस्त्यावर गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येला वनविभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत खैर तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या कारवाईत सुमारे सव्वसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत हकीकत अशी की, उपवनसंरक्षक रोहा आप्पा निकत तसेच सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड वनक्षेत्रपाल प्रियंका पाटील रात्रीची गस्त करीत असताना भालगाव येथे मुरुड-रोहा रस्त्यावर पहाटे 4.45 वाजता महिंद्रा बोलेरो पिकअप एमएच 06/बीडब्ल्यू 7813 ची चौकशीसाठी अडवली असता खैराच्या लाकडांची सोलीव नग 99 घ.मी. 1,589 किंमत 20,541/-, महिंद्रा बोलेरो पिकअप किंमत 7,00,000/- असा एकूण 7,20,541/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी प्रदीप सुतार, तेजस धाडगे, नामदेव उतेकर, सर्व राहणार महाड तालुका यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतचा पुढील तपास परिमंडळ वन अधिकारी भालगाव दिनेश दिघे, विजय कोस्बे, संतोष रेवणे, आर.जी. गायकवाड, विलास वाघमारे, वनरक्षक सचिन मानकर, जानकर इंदे, खेडकर, त्रिभुवन, वनमजूर संकपाळ, रोटकर करीत आहेत. या कारवाईवर निसर्गप्रेमी संदीप घरत यांनी संशय व्यक्त केला असून, सदरची झाडे शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी विकत घेतली असून, बिट वनपाल यांच्याशी संगनमत करून त्यांची तोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी वनपाल व वनरक्षक यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल करावी, अशी मागणी संदीप घरत यांनी केली आहे.