। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील लेडी कुलसुम व फातिमा बेगम ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने गरीब गरजु रुग्णांना स्वखर्चाने अलिबाग, पुणे मुंबई येथे वैद्यकीय उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे त्वरीत रिक्त पदे भरण्याची मागणी शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली. आ. जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करताना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, मुरुड शहरात असलेल्या लेडी कुलसुम व फातिमा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टर्स नसल्याने रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध होत नाही. सदर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यात येत असल्यामुळे अशा डॉक्टरांना दिलेला 1 वा 2 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉक्टर अन्यत्र निघून जात असल्यामुळे गत तीन वर्षापासून तेथे पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुरुड तालुक्यातील व परिसरातील गावातील गरीब गरजू रुग्णांना अलिबाग, पुणे व मुंबई येथे स्वखर्चाने वैद्यकीय उपचारासाठी जादे लागते. याप्रकरणी शासनाने चौकशी करून सदर ग्रामीण रुग्णालयासाठी पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकाची व डॉक्टरांची पदे भरून रुग्णांना वेळेवर रुग्णसेवा उपलब करुन देण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी केली.
त्यावर खुलासा करताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी रिक्त पदे असल्याचे मान्य करत सदरहू रुग्णालयाकरीता एकूण 20 मंजूर पदांपैकी 16 पदे भरण्यात आलेली असून, त्यांच्यामार्फत रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे म्हटले. सदयः स्थितीत, सदरहू रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय होवू नये व त्याठिकाणी रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून तेथील वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार भिषक, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. तसेच त्याठिकाणी उपलब्ध रुग्णसेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याचा दावा देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
मुरुड येथील दोन्ही रुग्णालयातील त्वरीत रिक्त पदे भरा – आ. जयंत पाटील
