शेकापकडून महावितरण, तहसीलदारांना निवेदन
| म्हसळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सर्वसामान्य वीज ग्राहकांची कोणतीही मागणी नसताना स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सक्तीने राबवत आहे, असा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाच्या म्हसळा तालुका शाखेने ही मोहीम तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. याबाबत म्हसळ्यातील महावितरण कार्यालय तसेच तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या आदेशानुसार तालुका कार्यकारिणीने नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत यांच्याकडे लेखी निवेदन देऊन ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये व सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हिताचा विचार करून ही मोहीम तातडीने स्थगित करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी तालुका चिटणीस विनायक गिजे, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य संतोष पाटील, ज्येष्ठ सदस्य महादेव म्हात्रे, विभागीय चिटणीस काशिनाथ पाटील, कार्यालयीन चिटणीस सूर्यकांत तांबे, राजाराम धुमाळ, किसन पवार, नारायण मोहिते, प्रकाश लोणशीकर, कानू लोणशीकर, सुरेंद्र शिर्के, विजय पयेर, धोकटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संतोष पाटील यांनी सांगितले की, महावितरणने स्मार्ट मीटरची सक्ती करून वीज ग्राहकांना नाहक त्रास दिल्यास शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शासनाविरोधात जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात येईल.तसेच, स्थानिक व सत्ताधारी लोकप्रतिनिधी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांनी केली. निवेदनाद्वारे स्मार्ट मीटर बसविण्याबाबत कोणतीही सक्ती न करता ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी शेकापच्यावतीने करण्यात आली.






